Sunday 27 December 2015

खरबूज लागवड तंत्र
-
Monday, December 28, 2015 AT 02:45 AM (IST)
Tags: agro planing
खरबुजाची लागवड थंडी कमी झाल्यानंतर केली जाते. या वेळी केलेल्या लागवडीची फळे बाजारात अधिक मागणीच्या काळात (एप्रिल-मे महिन्यात) येतात. त्यामुळे या फळांचा चांगला दर मिळू शकतो. त्यामुळे सध्या खरबूज लागवडीचे नियोजन करावे.
प्रा. एम. एच. गावडे, लीना शिंदे, विशाखा पोहरे 

खरबूज पिकाची लागवड यापूर्वी फक्त नदीपात्रातच होत होती. मात्र आता या पिकाची लागवड शेतजमिनीमध्येही मोठ्या प्रमाणात होत आहे.
महाराष्ट्रात गिरणा, तापी, वैनगंगा, पूर्णा, दुधना, गोदावरी, वर्धा इत्यादी नद्यांच्या पात्रात खरबूज लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. खरबुजाच्या फळाचा स्वाद व गराचा रंग यामध्ये भरपूर विविधता असते, म्हणून या फळाला विशेष महत्त्व आहे.

जमीन आणि हवामान - 
खरबूज पिकाच्या लागवडीस मध्यम काळी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी रेताड, पोयट्याची किंवा गाळाची जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७ असावा. अत्यंत हलकी किंवा चुनखडीयुक्त जमीन या पिकासाठी निवडू नये. या पिकास भरपूर सूर्यप्रकाश, उष्ण आणि कोरडे हवामान मानवते. वेलीच्या वाढीसाठी २४ ते २६ अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त ठरते.

लागवड - 
खरबुजाची लागवड जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात थंडी कमी झाल्यानंतर करतात. या पिकाची फळे एप्रिल-मे महिन्यात काढणीस तयार होतात.
फळे वाढत असताना तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त गेल्यावर फळात अधिक गोडी तयार होते.

सुधारित आणि संकरित जाती - 
१. पुसा शरबती -
या जातीची फळे ८५ दिवसांत तयार होतात. आकाराने गोल असतात. फळावरील साल जाळीदार असते. गराचा रंग नारंगी असतो. एका फळाचे वजन ५०० ते ७५० ग्रॅम असते. गरात साखरेचे प्रमाण ११ ते १२ टक्के असते. सरासरी उत्पन्न १० ते १३ टन प्रति हेक्‍टरी मिळते.

२. पुसा मधुरस -
या जातीची फळे आकाराने गोलाकार चपटी असून, वजनाला सरासरी एक किलोपर्यंत असतात. सालीचा रंग फिकट हिरवा त्यावर गडद हिरव्या रंगाचे पट्टे असतात. गरात साखरेचे प्रमाण १२ ते १४ टक्के असते. फळाचे सरासरी उत्पन्न १२ ते १६ टनांपर्यंत प्रति हेक्‍टरी मिळते.

३. हरा मधू -
या जातीला फळे उशिरा लागतात. फळे मोठी आकाराने गोल असून, फळावर गडद हिरव्या रंगाचे पट्टे असतात. गराचा रंग हिरवट असतो. गरात साखरेचे प्रमाण १२ ते १५ टक्के असते. फळामध्ये बिया कमी असतात. फळाचे सरासरी वजन एक किलोपर्यंत असते. या जातीशिवाय खरबुजाची पांढऱ्या गराची अरका, राजहंस, अराक जीत, हिसारमधून, आर. एस.-४ पंजाब सोनेरी, दुर्गापुरा मधू, पुसा रसराज, पंजाब रसिला इत्यादी सुधारित वाण आहेत.

४. पंजाब हायब्रीड -
खरबुजाचा हा संकरित वाण असून, वेली लांब २ ते २.५ मीटर लांबीच्या असतात. फळे हलक्‍या पिवळ्या रंगाची असतात. हलक्‍या रंगाची धारा असलेली जाळीदार साल, गर केशरी रंगाचा, चांगला स्वाद व सुगंध असणारी फळे, फळांना चांगली साठवण क्षमता असते. फळाचे वजन ४ ते ५ किलोपर्यंत असते.

बियाण्याचे प्रमाण -
खरबुजाचे १.५ ते २ किलो बियाणे प्रति हेक्‍टरी पुरेसे होते. एक लिटर पाण्यात २ ग्रॅम थायरम टाकलेल्या द्रावणात बिया भिजवून बाहेर काढाव्यात. या बिया ओल्या फडक्‍यावर २४ ते २८ तास ठेवून लागवड केल्यास उगवण चांगली होते. किंवा बी लागवडीपूर्वी १२ तास कोमट पाण्यात भिजवून नंतर रात्रभर ओल्या बारदाण्यात बांधून ठेवावे म्हणजे उगवण चांगली होते. पाटाच्या काठाला खड्डा करून ३-४ बिया २-३ सें.मी. खोल टोकाव्यात. बिया मातीने झाकून हलक्‍या हाताने माती दाबून घ्याव्यात. त्यानंतर हलके पाणी द्यावे. पाण्याची पातळी बी पेरलेल्या उंचीपेक्षा कमी असावी.

लागवडीचे अंतर आणि लागवड पद्धत - 
खरबुजाची लागवड रुंद सरी वरंबा पद्धतीने करतात. दोन सरीतील अंतर १.५ मीटर आणि दोन वेलीतील अंतर १ मीटर ठेवावे. खरबूज आळे पद्धतीने तसेच रुंद वाफे पद्धतीने लावता येते.

बीज प्रक्रिया -
खरबूज बियाण्यास पेरणीपूर्वी कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिम २.६ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात चोळावे.

खते आणि पाणी व्यवस्थापन 
- खरबूज पिकास २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत, ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश लागवडीच्या वेळी प्रति हेक्‍टरी द्यावे. लागवडीनंतर एक महिन्याने ५० किलो नत्राची दुसरी मात्रा द्यावी.
- एक महिन्याने नत्राची मात्रा दिल्यानंतर पिकास भर लावून घ्यावी. पिकास उगवण होईपर्यंत दोन पाण्याच्या पाळ्या लवकर द्याव्यात. त्यानंतर जमिनीच्या मगदूरानुसार वाफ्यावर पिकास पाणी द्यावे.

आंतरमशागत व वेलींना वळण देणे 
बियांची उगवण झाल्यानंतर नांगे असणाऱ्या ठिकाणी बी टोकून पाणी द्यावे. वाढणारे वेल पाटाच्या मधल्या भागात पसरू द्यावेत. वाढणाऱ्या फळांना पाणी लागू देऊ नये. पीक तणविरहीत ठेवावे. त्यासाठी दोन-तीन खुरपण्या कराव्यात.
- पीक ३५ ते ४० दिवसांचे झाल्यानंतर वेली जास्त हलवू नयेत. फळे लागल्यानंतर रोगट फळे काढून टाकावीत.
- ग्रीन हाउस किंवा पॉलिहाऊसमध्ये खरबुजाच्या संकरित वाणाची लागवड तारेवर वेली चढवून करता येते. त्यामुळे फळाचे अधिक उत्पादन मिळते.

काढणी व उत्पादन - 

खरबुजाचे फळ पिकू लागल्यानंतर फळाचा भरपूर वास येतो आणि देठ फळापासून वेगळे होते. फळाच्या सालीचा रंग बदलतो. फळे जास्त जाळीदार होतात. जाळीच्या मधली जागा पिवळसर होते. खरबुजाचे हेक्‍टरी २० ते २५ टनांपर्यंत उत्पादन मिळते.

No comments:

Post a Comment